विवेक ठाकरे साईमत, जळगाव :
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून प्रबळ दावेदार म्हणून निवडणूकीपूर्वी त्यावेळी चर्चेत आलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे उमेदवारी न मिळाल्याची सल मनात ठेवत ऐन निवडणुकीत निष्क्रिय राहिल्याचे चित्र असतांना आता खा.रक्षाताई खडसे यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याने जावळे यांच्याकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्याच्या आनंदाचे उसने अवसान दाखवले जात आहे.
लोकसभा निवडणूकसाठी आपली उमेदवारी निश्चित असल्याच्या अविर्भावात असलेले अमोल जावळे यांचा पत्ता कट झाल्यावर आणि रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेर,यावल व वरणगाव भागातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा नाट्य गाजले होते. दरम्यान, रक्षाताई यांना भाजपा कार्यालयात मंत्री गिरीष महाजन यांच्यासमोर जाब विचारणाऱ्या एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयात सुद्दा व्हायरल केला गेला होता. या सर्व घडामोडींच्या मागे उमेदवारी न मिळालेल्या अमोल जावळे हेच असल्याची त्यावेळी चर्चा होती.त्यांच्या अशा पडद्यामागील भूमिकेच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रारी गेल्याने प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीत शिस्तीला महत्व असून यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही अशी तंबी देत उमेदवारीवरुन नाराज असलेल्या जावळे यांना एकाच ईशाऱ्यात सुतासारखे सरळ केले होते. तरीही जिल्हाध्यक्ष म्हणून अमोल जावळे हे रक्षाताई यांच्या प्रचारात फार सक्रिय राहिले नसल्याचे दिसून आले होते. मात्र रक्षाताई खडसे यांनी गेल्या दोन वेळेच्या त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेली कामे, गावागावात पोचवलेल्या विकास योजना व मोदी फॅक्टरमुळे प्रचंड बहुमताने विजय संपादन केला.यापुढे नशिबाने केंद्रीय राज्यमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे चालून आले.
राजीनामा नाट्यांतील कार्यकर्ते तोंडावर आपटले
रावेर लोकसभेच्या जाहीर झालेल्या उमेदवारीवरुन नाराजी दाखवत अमोल जावळे यांच्या सन्मानार्थ राजीनामा देणारे कार्यकर्ते ऐन निवडणुकीत गप्प दिसून प्रचारात सुद्धा निष्क्रिय असले तरी रक्षाताईंचा प्रचंड मताधिक्क्याने विजय आणि मंत्रिपदी लागलेली वर्णी पाहून तत्कालीन नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते तोंडघशी पडलेत. रक्षाताई व त्यांच्या निवडणूकीचे सूक्ष्म नियोजन करणारे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ यांच्या गुगलीमुळे बदलेली राजकीय समीकरणे व नाथाभाऊ यांचे पक्षातील कमबॅक लक्षात घेऊन हेच पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यावर खाजगीत खापर फोडत आहेत.
नाईलाजाने आनंदोत्सवाचे उसने अवसान
खा.रक्षाताई खडसे गेल्या 4 जून रोजी लागलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यावर याचे श्रेय जिल्हाध्यक्ष म्हणून अमोल जावळे यांच्याकडे आपोआप गेले असते तथापि चोराच्या मनात चांदणे म्हणून विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया देणे सुद्धा त्यावेळी जावळे यांनी टाळले.पण काल खा. रक्षाताईंना मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर जिल्हाध्यक्ष अमोल जावळे एकदम अभिनंदनाच्या पोस्ट आणि जाहिरातीतून प्रकट होऊ लागल्याने त्यांच्या या उसणे अवसानाच्या अँक्टिव्ह मोडमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.