साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव ।
शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला जळगावसह नाशिक, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये उपचारांसह शस्त्रक्रियांची गरज असेल आणि त्यासाठी केवळ ५, १० नव्हे तर अगदी ५० लाखांपर्यंत खर्च येणार असला तरी भाजपाकडून ही वैद्यकीय मदत मोफत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. सामान्य नागरिकांसाठी हा एक भाजपाकडून मदतीचा वेगळा विभाग सुरु केला आहे. त्यामुळे गरजु रुग्णांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. गरजू रुग्णांवर विनामूल्य उपचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले अशा विविध मदतीच्या योजना असल्या तरी बहुतांशवेळा निरक्षर आणि शहरांची, शासकीय कार्यालय, कागदपत्रांची माहिती नसलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यांना कागदपत्रांची योग्य माहिती समजत नाही. त्यामुळे असा हा सर्व अपव्यय टाळण्यासाठी भाजपाच्या जळगाव मध्यवर्ती कार्यालयात २४ तास वैद्यकीय मदत कक्ष सुरु राहणार असल्याचेही ते म्हणाले.
मदतीसाठी वैद्यकीय मदत कक्ष सक्रीय असणार
सर्वसाधारण रुग्णालयांसोबत मुंबईतील ब्रीच कँडी, लिलावती, जे.जे. हॉस्पिटल, नायर, जसलोक, एच.एन.सारख्या मोठ्या रुग्णालयांमध्येही रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होणार असली तरी रुग्णांना विनासायास सर्व माहिती, प्रक्रिया आणि वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी हा वैद्यकीय मदत कक्ष सक्रीय असणार आहे. त्याठिकाणी शासनाच्या विविध योजनांची ५ ते ५० लाखापर्यंत मोफत शस्त्रक्रियांची माहिती मिळणार आहे. तसेच गरजू रूग्णाला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी टिम काम करणार असल्याचेही मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा
गरजू रुग्णांना विविध आजारांवरील उपचारासाठी आर्थिक परिस्थितीमुळे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नाही. त्यामुळे परिवारासह नातेवाईकही हतबल होतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी भाजपाने गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा. मदत कक्षातील टीम रुग्णांना योग्य मार्गदर्शन करणार आहे.