तरुणाईच्या सर्जनशीलतेसह कलागुणांना महोत्सवातून व्यासपीठ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित केलेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव “इंद्रधनुष्य २०२५” स्पर्धेच्या लोगोचे मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यापीठ परिषद सदस्य नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. राम भावसार, प्रा. उज्ज्वल पाटील आणि उपवित्त लेखाधिकारी एस. आर. गोहिल उपस्थित होते.
लोगोची संकल्पना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची आहे. त्यानुसार हा लोगो साकारला आहे. राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यपालांच्या प्रेरणेने आंतरविद्यापीठ स्तरावर “इंद्रधनुष्य” ही कला व सांस्कृतिक स्पर्धा सुरु केली आहे. महोत्सवातून तरुणाईच्या सर्जनशीलतेसह कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे.



