उद्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज
जळगाव ( प्रतिनिधी)
सध्या जळगावसह राज्यात उन्हाचा कहर असून हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असल्याने जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
४ ते ९ मेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे जळगावकरांसाठी पुढील आठवडा पावसाचाच राहण्याची शक्यता आहे. जळगावकरांसाठी मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी तापमान राहणार असले, तरी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक ४४ अंशपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारे पश्चिम-उत्तर वाऱ्यांमुळे तापमानाची तीव्रता वाढली आहे. जळगावचे तापमान शुक्रवारी ४३.९ अंशांवर पोहोचले.
या हंगामात सरासरी ४२ ते ४३ अंश तापमान राहिले असले तरी पारा ४४ अंशापर्यंत पोहचलेला नव्हता. मात्र, गुरुवारी पारा ४४ अंशाच्या पुढे गेला. ३ मेपर्यंत जळगाव शहर व जिल्ह्यात तापमानाचा कहर राहणार आहे. ४ मेपासून तापमानात काही अंशी घट होऊ शकते.
यंदा मे महिन्यातील काही दिवस अवकाळी पावसाचे व ढगाळ वातावरणाचे राहणार आहेत. त्यात २३ ते २५ मेनंतर मान्सूनपूर्व पावसालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.
3 मे ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग आणि किरकोळ पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरण ढगाळ असेल आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे