शेतकऱ्यांचे पीक आणि घरांचे मोठे नुकसान
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी –:
मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामीण भाग मंगळवार, २७ जानेवारी रोजी निसर्गाच्या प्रचंड कोपाखाली आला. अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे तालुक्यातील कोथळी, चांगदेव, चिंचोल, मानेगाव, वढवे, उचंदे, पंचाना, मेळसांगावे, दुई, सुकळी आणि खामखेडा या जवळजवळ १० ते १२ गावांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः गहू आणि मका यांचे दाणे भरण्याच्या टप्प्यात असताना वादळी वाऱ्यामुळे उभी पिके झोपली आणि अनेक बळीराजे आपले प्रयत्न अपुरे पडल्याने हतबल झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक कच्च्या घरांवरील छप्पर उडून गेले, भिंती कोसळल्या, ज्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून त्वरित नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. त्यांनी कोथळी, चांगदेव आणि परिसरातील शेतांच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी केली आणि शेतकरी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असे आमदार पाटील यांनी यावेळी प्रतिपादन केले.
तत्पूर्वी आमदारांनी तहसीलदार आणि कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी त्वरित पाचारण केले. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट केले की, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे २४ तासांच्या आत पूर्ण करावे, आणि कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहू नये. याशिवाय, नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आमदार सक्रियपणे पाठपुरावा करतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांच्या या दौऱ्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक आता प्रशासनाच्या मदतीसाठी आणि शासनाच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करत आहेत.
