साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चांदसर येथील मंडळ अधिकाऱ्यांनी बांभोरी नदीपात्रातून पकडले होते. ते ट्रॅक्टर धरणगाव तहसील कार्यालयात घेवून जात असताना पोलिसांची नजर चुकवून ट्रॅक्टर चालक फरार झाला. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
महसूल विभागाच्या गौण खनिज वाहतूक प्रतिबंध पथकात काम करणारे चांदसर भागाचे मंडळ अधिकारी अविनाश पांडुरंग पाटील, धरणगाव पो.स्टे.चे पो.हे.कॉ.प्रदीप सोनवणे यांना बांभोरीचे तलाठी विरेंद्र सोनकांबळे यांचा भ्रमणध्वनीद्वारे फोन आला होता. त्यांनी स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जात असल्याची माहिती देऊन त्यात वाळू असल्याचे सांगितले. त्यावरुन ट्रॅक्टरचा पाठलाग करून ते पकडले. तेव्हा चालकाने त्याचे नाव आणि गाव सांगण्यास नकार दिला. यावेळी त्याने ट्रॅक्टरचे मालक अक्षय पाटील (रा.पाळधी) असल्याचे सांगितले. यावेळी त्याचे फोटो काढून दोन पंचासमक्ष ट्रॅक्टर पो.हे.कॉ.प्रदीप सोनवणे यांना धरणगाव येथील तहसील कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले. यावेळी ट्रॅक्टर मालक अक्षय पाटील याने साहेबांशी बोलायचे आहे, असे सांगून ट्रॅक्टर थांबविले. फोनवर बोलत असताना अचानक पोलिसांची नजर चुकवून ट्रॅक्टर मालक फरार झाला. यावेळी त्याचा पाठलाग केला असता तो कच्च्या रस्त्याने फरार झाला. याप्रकरणी अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर मालक अक्षय पाटील आणि चालक (नाव, गाव माहित नाही) त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास गजानन महाजन करीत आहे.