साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विविध क्रीडा संघ महोत्सव स्पर्धेसाठी रवाना झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दि. १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणा-या क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी विद्यापीठाचे व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, टेबलटेनिस संघ सहभागी होण्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान खेळाडूंचा एकत्रित सराव शिबिराचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले.
या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील उपस्थित होते. डॉ. माहेश्वरी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देतांना खेळाडूंनी शिस्त पाळावी व नियमित सराव करावा. नियमित सराव हा अत्यावश्यक असून सरावामुळेच यश प्राप्त होते व आपण ही यश प्राप्त कराल या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. शैलेश पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. संजय भावसार, प्रा. अन्वर खान, डॉ. नरेश बागल, डॉ. देवदत्त पाटील, प्रा. यशवंत देसले हे रवाना झाले आहेत. अशी माहिती क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी दिली आहे.
