विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नव्या शैक्षणिक धोरणात सहज उपलब्धता, समान संधी, जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, माफक दरात शिक्षणाची व्यवस्था ही पाच उद्दिष्टे असल्याने देशातील विद्यापीठांनी त्या अनुषंगाने कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुस्तक प्रकाशनासह लेखक सन्मान कार्यक्रमात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवारी, १२ जुलै रोजी पुस्तक प्रकाशनासह लेखकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी होते. यावेळी मंचावर आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्र. कुलगुरू एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले की, देशात उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ २८ टक्के आहे. ते किमान ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. खुल्या वैकल्पिक पाठ्यक्रमाच्या तयार केलेल्या पुस्तकाबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वयंमचे कोर्सेस करावे. तसेच विद्यापीठाने अप्रेंटिसशिप एम्बेडेड प्रोग्राम अंतर्गत केलेल्या नवीन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाचे कौतुक केले.
३ लाख ९६ भारतीय भाषेच्या पुस्तकांच्या तयारीसाठी काम सुरू
भारतीय भाषा पुस्तक परियोजना केंद्र सरकारकडून राबविली जात आहे. ३ लाख ९६ भारतीय भाषेची पुस्तक तयार करण्यासाठी काम सुरू आहे. त्यात आपले कबचौउमवि हे विद्यापीठ एक पाऊल पुढे आहे, असे सांगून मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते विद्यार्थ्यांना लगेच समजू शकते. तसेच भाषा ही ज्ञान संपादनाची मर्यादा असू शकत नाही. यापुढचे शिक्षण अध्यापक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित असणार आहे. त्याकरिता अध्यापकांनी सज्ज असायला हवे, असे प्रा. सुनील कुलकर्णी यांनी सांगितले.
१० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचणार
भाषेची मर्यादा कुठेही राहू नये, म्हणून हे नवीन धोरण लागू केले आहे. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुआयामी धोरण आहे. त्यातला महत्त्वाचा आयाम म्हणजे त्या भागाचे शिक्षण त्या मातृभाषेत देणे आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले आहे. आज प्रकाशित झालेली पुस्तके ती निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. या वर्षापासून १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही तयार केलेली पुस्तके पोहचणार असल्याचे अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.
१४ पुस्तकांसह माहिती पत्रकाचे प्रकाशन
कार्यक्रमात विद्यापीठाने खुल्या वैकल्पिक विषयांवरील १४ पुस्तकांसह त्यांच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ही पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचा सन्मान केला. कार्यक्रमात पीजी डिप्लोमा इन पेटंट व्हॅल्युएशन अँड मॅनेजमेंटच्या प्रारंभाची घोषणा कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी केली. तसेच विद्यापीठाने बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत विद्यापीठाचे मंजूर झालेले पेटंटच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी पुस्तकांचे लेखक प्रा. शैलेश कुमार वाघ, प्रा. प्रभाकर महाले यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस. एस.राजपूत, प्रा. जगदीश पाटील, व्य. प सदस्य प्रा. पवित्रा पाटील, बौद्धिक संपदा कक्षाचे समन्वयक प्रा. डी जी हुंडीवाले, प्रा. विकास गीते, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, प्रशाळांचे संचालक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.