शाळेला १६ पंख्यांची भेट, वृक्षारोपणातून अभिवादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सध्या सर्वत्र माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे उत्साहात होत आहेत. जुन्या आठवणी जागवणे, शिक्षकांशी संवाद साधणे, गप्पा-गोष्टी, खेळ यामधून स्नेहबंध दृढ केले जातात. मात्र, मेहरुण भागातील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातील १७ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तब्बल १६ पंख्यांची भेट देऊन तसेच शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक स्व. एस. एम. खंबायत यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून अनोखी गुरुदक्षिणा अर्पण केली. अध्यक्षस्थानी सदाशिव सोनवणे होते.
स्नेहभेट कार्यक्रमाच्या चर्चेवेळी मुख्याध्यापक खंबायत यांनी शाळेत पंख्यांची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु काही दिवसांनंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याऐवजी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले.यावेळी जय भवानी शिक्षण मंडळाचे संचालक अरुण सानप, उत्तमराव नेरकर, बाळकृष्ण पाटील, सोमनाथ सानप तसेच मुख्याध्यापिका एच. एम. अत्तरदे उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सचिन लाडवंजारी, पंकज तायडे, अतुल बारी, सरला सानप, दीपाली नाईक, दीपाली वंजारी, हितेंद्र बढे, ताराचंद लाड यांनी परिश्रम घेतले.



