साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून दोन्हीही नेते एकत्र येऊन पुन्हा हातात हात घेऊन काम करतील असा मला विश्वास आहे,असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.
आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यावर ना.श्रीमती खडसे यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले आहे.मुक्ताईनगर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.या पार्श्वभूमीवर त्यांनी नाथाभाऊ व गिरीषभाऊ यांना एकत्र आणण्याचा आपला मनोदय बोलून दाखवल्यावर या बाबीचे अनेकांनी स्वागत केले आहे.
मंत्री श्रीमती रक्षाताई म्हणाल्या की,नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच. माझी इच्छा आहे की,भारतीय जनता पार्टीसोबत जेवढे लोक जोडतील तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल.नाथाभाऊ हे भाजप मधील खूप जुने, अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे गिरीशभाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे.नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः नक्की प्रयत्न करेल,गेल्या चार-पाच वर्षापासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे,परंतु माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे की या दोघं ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे.
मागील काळामध्ये जेव्हा या दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे.मात्र मागील काळात काही नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप मनाला पटणारे नव्हते आणि कार्यकर्त्यांना सुद्धा हे सर्व पसंत नसल्याने आता एक चांगली संधी आहे.कारण गिरीशभाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत.त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचा खूप चांगला विकास होईल,असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.
ना.श्रीमती रक्षाताई यांची राजकीय परीपरिपक्वता :
केंद्रीय राज्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्यावर ना.रक्षाताई खडसे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी एकत्र येण्याचे केलेले विधान वजा आवाहन त्यांच्या दूरदृष्टीसह राजकीय परिपक्वता दर्शविणारे आहे. जिल्ह्याच्या सामाजिक विकासासाठी खडसे-महाजन एकत्र येणे किती गरजेचे आहे,याची कळवळ जेव्हा त्या व्यक्त करीत आहे या बाबीचा स्वतः नाथाभाऊ -गिरीषभाऊ यांच्यासह पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाल्याने विचारमंथन करावे,अशी चर्चा आता सुरु झाली आहे.