जळगाव जि.प.चे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांची माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गणवेश योजनेतून काही विद्यार्थी वंचित राहिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. यासंदर्भात शिक्षण विभागाने खुलासा केला आहे. सध्या वितरण प्रक्रियेत कोणतीही गोंधळ अथवा अपूर्णता नाही. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत गणवेश योजनेसाठी २०२३-२४ च्या यू-डायस माहितीच्या आधारे मंजूर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार गणवेशाची रक्कम वितरित केली आहे. पात्र विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणवेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष सुरू होताना लाभार्थी संख्या थोडी कमी भासत असली तरी संख्येत हळूहळू स्थिरता येत आहे. तालुकास्तरावर समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया येत्या २५ जुलै तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच १०० टक्के वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही सचिन परदेशी यांनी दिली.