साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी पार पडली. सरळ गुप्त पद्धतीने मतदान होऊन त्यात सत्ताधारी अक्षय जैस्वाल यांच्या गटातील एक सदस्य फुटल्याने भाजपाचे युवा ग्रामपंचायत सदस्य दीपक रामदास खरे हे नऊ मते घेऊन उपसरपंचपदी विजयी झाले. सरपंच जैस्वाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. उपसरपंचपदी दीपक खरे यांची निवड जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके, गुलालाची उधळण करत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली.
तत्कालीन उपसरपंच अशोक चौधरी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अध्यासी निवडणूक अधिकारी तथा सरपंच अक्षय जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत १७ सदस्य उपस्थित होते. यावेळी जैस्वाल यांच्या गटातर्फे उषाबाई मोरे तर भाजपचे कैलास चौधरी गटातर्फे भाजपा युवा ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन भरले. गुप्त पद्धतीने मतदान होऊन दीपक खरे यांना ९ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. सत्ताधारी जैस्वाल गटाचा एक सदस्य फुटल्याने लोहारा ग्रामपंचायतीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
भाजपाची रणनीती यशस्वी ठरली
राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक भाजपा युवा नेते ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, शरद सोनार, डॉ.सुभाष घोंगडे यांची उपसरपंच पदाच्या निवडणुकीत रणनीती यशस्वी ठरली. मिरवणुकीत ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, संभाजी चौधरी, शेख हसन साहेबलाल, सायली तडवी, कल्पना गिते, सादिक मन्नानखा, मुक्ताबाई कोळी, दीपक पवार, अनिल तडवी, राजू गीते, अतुल कोळी, प्रवीण चौधरी, डॉ.केयुर चौधरी, संजय पाटील, सुनील खरे, विजय बाविस्कर, अमित खरे, पांडुरंग सरोदे, शाम बागुल, राजू लिंगायत, दिलीप खरे, चंद्रकांत पाटील, नाना चौधरी, भास्कर भोई, रमेश लिंगायत, उमेश देशमुख, शरद कोळी, योगेश चौधरी, महेंद्र घोंगडे, शोएब खान, वसीम खान, रुपेश धनगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
एका सदस्याने बंड करीत भाजपाला केले मतदान
सरपंच अक्षय जैस्वाल यांच्या मनमानी कारभाराला लोहारा गावची संपूर्ण जनता त्रस्त झाली आहे. त्यातूनच कंटाळून त्यांच्या गटातील एका सदस्याने बंड करीत भाजपच्या दीपक खरे यांना मतदान केल्याने त्यांचा विजय झाला.
