माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते ‘श्रीं’ची स्थापना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कूल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी, २७ ऑगस्टपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते ‘श्री’ गणेशाची प्रतिष्ठापना करुन आरती करण्यात आली. तत्पूर्वी, लेझीमसह ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतून ‘श्रीं’ची मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी जयश्रीताई महाजन यांनी शाडू माती किंवा स्वहस्ते तयार केलेल्या शेतमातीच्या मूर्तींचाच स्वीकार करावा. ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, निर्माल्य कलशाचा वापर करावा आणि उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना केले. यशस्वीतेसाठी ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे, विकास नेहेते, विजय चौधरी, सरोज पाटील, आशा चौधरी आदी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.