साईमत जळगाव प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबीयांचा संताप उफाळून आला. या निर्णयाविरोधात इच्छुक उमेदवार संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांना थेट घेराव घातल्याची घटना हॉटेल रॉयल पॅलेस येथे घडली. या घडामोडीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उमेदवारी नाकारल्याने प्रचंड नाराज झालेल्या संगीता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार सुरेश भोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पक्षासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले, निवडणुकीसाठी तयारी केली असतानाही अचानक उमेदवारी नाकारण्यामागे नेमके कारण काय, असा जाब यावेळी विचारण्यात आला. वरिष्ठ पातळीवर आमची बाजू मांडण्यात का अपयश आले, असा सवालही कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आला.
यावेळी संगीता पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलत आहोत, त्याच ठामपणे तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी आमच्यासाठी बोला. गरज पडल्यास आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण करा. आमच्यावर अन्याय झाला आहे,” अशी थेट आणि आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. या दरम्यान कुटुंबातील सदस्यांना भावनांचा आवेग अनावर झाला असून काहींच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले.
संपूर्ण प्रकारादरम्यान आमदार सुरेश भोळे हे अस्वस्थ आणि हतबल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कुटुंबीयांच्या आक्रमक प्रश्नांवर ते शांत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. उमेदवारी नाकारण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर घेतला जातो, असे सांगत त्यांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे भाजपातील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, उमेदवारी वाटपावरून स्थानिक पातळीवर किती तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, हे या प्रकारातून स्पष्ट झाले आहे. पुढील काळात पक्ष नेतृत्व या नाराजीची दखल घेतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
