मुंबई : प्रतिनिधी
शासकीय रुग्णालयांंमध्ये उपचार घेणाऱ्यांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जातात.राज्य सरकारकडे स्वत:ची जाहिरात करायला पैसे आहेत.गुवाहाटी आणि गुजरातला फिरायला जाण्यासाठी पैसे आहेत मात्र सरकारी रुग्णालयांमधे उपचार घेणाऱ्या जनतेच्या औषधांंसाठी पैसे नाहीत.ही अत्यंत संतापनजक बाब आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हे भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूसत्रावरुन राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सत्ताधारी पक्षाच्या मस्तवाल नेत्याने नांदेड रुग्णालयाच्या डीनला शौचालयाची साफसफाई करायला सांगितली. यामुळे डीनने संबंधित नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताच सूडाच्या भावनेतून डीनवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत असतील तर सरकारी योजनांचे पैसे त्यासाठी का वापरले जात नाहीत? कोरोनाची साथ असताना राज्यात औषधांचा इतका तुटवडा जाणवला नव्हता मग आता कोणतीही साथ नसताना राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा का जाणवत आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार
उद्धव ठाकरे यांनी औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचेही सूतोवाच केले.हाफकिन संस्थेमार्फत सरकारी रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी केली जात असे मात्र आता राज्य सरकारने ही पद्धत बंद केली आहे.निविदा प्रक्रिया न राबवताच थेट औषध खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.यामुळे औषध खरेदीत मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो. राज्य सरकारने एखाद्या दलालाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे का?सरकारच्या या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे बळी जात आहेत त्यामुळे जनतेने हे सरकार घालवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आरोग्यमंत्री फक्त पोस्टर्सवर
शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सर्व खापर डॉक्टरांवर फोडून चालणार नाही.रुग्णालयात औषधांचा तुटवडा असेल तर त्यामध्ये डॉक्टरांचा दोष नाही.टेंडरविना औषध खरेदी होत असेल तर भ्रष्टाचार होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकारकडे औषध खरेदीसाठी पैसे नसणे ही संतापजनक बाब आहे. इतके मृत्यू होऊनही राज्याचे आरोग्यमंत्री कुठेच दिसत नाहीत.ते फक्त पोस्टर्सवर दिसतात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
३