मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना ‘शिवसेना फोडणारा औरंग्या’ असा त्यांचा उल्लेख केला होता. या टीकेला आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना हल्ली इतिहासाची खूप आठवण यायला लागली आहे. अफझल खान काय, औरंग्या काय, आणखी काय-काय सुरू आहे.
संजय शिरसाट म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे यांना इतिहास माहिती नाही. त्याना वाटते की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी जी वाक्य शोभत होती, ती वाक्यं आपण फेकली तर लोक ती वाक्यं झेलतील. परंतु, आता लोकांना कंटाळा आला आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडे दुसरा काही कार्यक्रम नाही. ३१ ऑगस्टला राहुल गांधी मुंबईत येतील.त्यामुळे ते कधी येतील? त्यांच्यासाठी जेवण काय बनवायचं? त्यांना काय वाढायचं? यावर विचार सुरू आहे.
आमदार शिरसाट म्हणाले, राहुल गांधी मुंबईत आल्यावर त्यांच्या उजवीकडे कोणी उभं राहायचे? संजय राऊतांनी उभं राहायचे की स्वतः उद्धव ठाकरे यांनी उभं राहायचे? यावर त्यांचे सध्या चिंतन सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार अंमलात आणत आहेत ना ते? ‘सोनिया’चा दिवस कधी येणार याची ते वाट पाहत आहेत. तो दिवस ३१ ऑगस्टला येणार आहे. तोवर यांच्याकडे दुसरा कार्यक्रम नाही,तोवर ते अशी भंपकबाजी करत राहणार.
संजय शिरसाट म्हणाले की, अशी भंपकबाजी करून आपलं अस्तित्व आहे हे दाखवायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. एक दिवस असा येईल, ते म्हणतील कोण आहे रे तिकडं? त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणीच दिसणार नाही. संजय राऊतांशिवाय तिथे कोणीच नसेल.