साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
हिंदू समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला. ते चाळीसगाव येथे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष नितीन पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बाविस्कर, ब्राह्मणशेवगेचे सरपंच रत्नाकर पाटील, इच्छापुरचे सरपंच निलेश राठोड, युवा मोर्चाचे रुपेश पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य राम पाटील आदी उपस्थित होते.
देशात अस्थिरता माजविणे, जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेट पाकिस्तान धार्जिणी धोरणे राबविणे ही इंडी आघाडीची नीती उघड झाली आहे. भारतातील प्रगती, समृद्धी, आणि आर्थिक उन्नतीमुळे जगात वाढत असलेली भारताची प्रतिष्ठा व ताकद सहन होत नसलेल्या विदेशी शक्तींनी इंडी आघाडीमार्फत आपल्या कारवाया सुरू केल्या असाव्यात, असा संशयही अजित चव्हाण यांनी व्यक्त केला. समाजात फूट पाडल्याखेरीज आपल्या कारवाया यशस्वी होणार नाहीत, असा त्यांचा कयास असला तरी देशातील समाज कारवाया यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वासही अजित चव्हाण यांनी व्यक्त केला.