साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
धरणगाव तालुक्यातील पाळधी खु.भागातील शनीनगरात मध्यरात्रीच्या सुमारास मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. याप्रकरणी नागरिकांनी दोघा चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी खु.भागातील शनीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास शेख असलम शेख रहीम यांची मोटार सायकल (क्र. एमएच १९ डीसी ९७०६) दोन चोरटे चोरून नेत होते. मात्र, त्याचवेळी काही जणांना काहीतरी आवाज आल्याने त्यांनी दोघांचा पाठलाग केला. त्यांना पाळधी पोलीस चौकी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून मोटार सायकलही ताब्यात घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी अशरफ मोहम्मद हनीफ, शेख सद्दाम शेख शरीफ (दोन्ही रा.मालेगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेचा तपास करीत असतांना पाळधी पोलिसांना दोघांच्या जबाबानुसार त्यातून मोठ्या टोळीचा छडा लावण्यात यश येणार असल्याची माहिती पाळधी पोलिसांनी दिली. याच टोळीकडून चोरीची वाहने शोधून ती परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी शेख असलम शेख रहीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल पाटील, गजानन महाजन करीत आहेत.