वरणगाव नजिकच्या हॉटेलवरून चोरी झाला होता ट्रक
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील एका हॉटेलवरून रात्रीच्या वेळी चोरी गेलेल्या ट्रक प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.याप्रकरणी पोलिसांनी फिरविलेल्या तपास चक्रात फिर्यादी ट्रक चालकासह पोलिसांनी अन्य दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेला ट्रक अद्याप जप्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविस्तर असे की, पाळधी येथील ट्रक चालक अरबाज खान तस्लीम ( वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एम. एच. ४३ -वाय-८०८७ ) भुसावळ – वरणगाव महामार्गाने येत असतांना वरणगाव नजिकच्या महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी रात्री थांबला होता. मात्र, रात्री ट्रक चोरीला गेल्याचे चालकाच्या सकाळी लक्षात आल्याने त्याने याबाबतची माहिती ट्रक मालकाला देवून ट्रक चोरीला गेल्याबाबत ८ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यावर ट्रक चोरीच्या घटनेतील फिर्यादी चालक अरबाज खान तस्लीम आणि त्याचा साथीदार क्लिनर तस्लीम अयुब खान ( वय ५४, ६० घर मोहल्ला, दोघे रा.पाळधी) युसुफ खान अमीर (वय ४८ रा. जामनेर) यांना बुधवारी, ११ रोजी अटक केली.
ट्रक अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही
चोरीला गेलेला ट्रक अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. अटकेतील आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.