एमआयडीसी पोलिसांची कारवाई, दोन दिवसांची पोलीस कोठडी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील अजिंठा चौकात एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून २२ हजार ५०० रुपयांची रोकडसह मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अजिंठा चौकातील बस थांब्यावर एक व्यक्ती २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धुळे येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होता. त्याचवेळी एक चारचाकी वाहन त्याच्याजवळ थांबले. त्या वाहनातील अज्ञात व्यक्तींनी त्याला कुठे जायचे आहे…?, असे विचारले. धुळे येथे जायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी ‘आम्ही तुम्हाला सोडून देतो,’ असे सांगून त्याचा विश्वास जिंकला. गाडीत इतर प्रवासी असल्याचे भासवून त्याला पुढील सीटवर बसण्यास सांगितले. थोड्या अंतरावर गेल्यावर गाडीत जागा नाही, असे सांगून त्याला खाली उतरवले आणि ते पुढे निघून गेले. गाडीतून उतरल्यानंतर त्या व्यक्तीला आपला मोबाईल आणि खिशात असलेली २२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.
नशिराबादमधील बाजार परिसरात रचला सापळा
पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत नशिराबाद येथील बाजार परिसरात सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वसिम अजमल खान (वय ३५, रा. नशिराबाद) आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार (वय ४२, रा. साथी बाजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली २२ हजार ५०० रुपयांची रोकड, मोबाईल आणि गुन्हा करताना वापरलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती अर्टीगा गाडी जप्त केली आहे.