सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बजावली कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव शहरासह रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच जळगाव आरपीएफने धडक कारवाई करत दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कामगिरी बजावत २६ जून रोजी त्यांच्या ताब्यातून ५ महागडे मोबाईल फोन हस्तगत केल्याची माहिती शनिवारी, २८ जून रोजी आरपीएफ विभागाने दिली.
सविस्तर असे की, भिकन नवल पाटील ह्या प्रवाशाचा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल बदनेरा-नाशिक मेमो ट्रेनमध्ये चढत असताना जळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून १७ जून रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल केला होता. आरपीएफ इन्स्पेक्टर अमित कुमार यादव यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले. फुटेजच्या मदतीने एका संशयित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एसआय मनोज सोनी, एएसआय शिवपूजन सिंग, कॉन्स्टेबल पंकज वाघ, विनोद जेठवे आणि मनोज मौर्य यांच्या पथकाने संशयितावर पाळत ठेवली. त्यानंतर त्याच्या एका साथीदारासह त्याला ताब्यात घेतले.
चौकशीवेळी पाच मोबाईल फोन जप्त
चौकशीवेळी आरोपींकडून पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यांनी जळगाव शहर बसस्थानकातून तीन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख इमरान शेख गुफरान (वय २२, रा. मालेगाव) आणि शेख अशफाक शेख मुस्ताक (वय ३०) यांचा समावेश आहे. पुढील कारवाईसाठी शेख इमरानला जळगाव शहर पोलिसांकडे तर शेख अशफाकला भुसावळला जीआरपी यांच्या ताब्यात दिले आहे.