जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पोलीस असल्याची बतावणी करत दुचाकीस्वारांनी संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी लांबविली. ही घटना २७ मे रोजी बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली होती. याप्रकरणी सोमाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय सोमाणी हे दुचाकीने घरी जात असताना पोलिसांचा गणवेश घातलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. त्यानंतर सोमाणी यांनी त्यांना वाहन परवाना दाखविला. त्यातील एकाने पंजाब व उत्तर प्रदेश येथून काही लोक आले आहेत, तुमच्या हातातील अंगठी व सोन्याची चेन काढून ठेवा, असे सांगत दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. चेन व अंगठी रुमालात गुंडाळल्यानंतर सोमाणी यांनी तो रुमाल खिशात ठेवून निघून गेले. काही वेळाने त्यांनी रुमालात पाहिल्यावर त्यात त्यांना दोन दगड निघाल्याचे आढळून आले. यानंतर त्यानंतर जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली होती.