जुना वाद पुन्हा पेटला परिसरात दगडफेक आणि तोडफोड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात झालेली तुफान हाणामारी ही घटना धुलिवंदनाच्या दिवशी घडली. यानंतर किरकोळ दगडफेक झाली असून घरांच्या गेटची तोडफोड देखील नोंदवण्यात आली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव नियंत्रणासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटांतील नागरिकांचा जमाव झाल्याने दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, दगडफेक फारशी मोठी नसून मुख्य कारण जुने वाद होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिस सतर्कतेने घटनास्थळी पहारा देत आहेत.या घटनेमुळे मेहरूण परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
