साईमत, यावल : प्रतिनिधी
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि फैजपूर पोलीस उपनिरीक्षक सय्यद मयनुद्दिन यांच्या पथकाने तालुक्यातील कासवे येथील बंद स्टोन क्रशर येथून समान नंबरचे दोन रिकामे डंपर पकडून कारवाई केली आहे. दरम्यान, तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहनांसह अनेक मोटरसायकली, बुलेट, रिक्षा मिनीडोर, ॲपे रिक्षा, कालीपिली प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे आरटीओ आणि पोलिसांनी तपासली तर अनेक बोगस नंबरची वाहने आढळून येण्याची शक्यता आहे.
कासवे येथील नदी पात्राजवळ अंदाजे १० ब्रास रेती साठा जप्त करण्याची कारवाई करून जप्त केलेला साठा यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला. दरम्यान, समान नंबरचे डंपर पकडल्याने फैजपूर पोलिसात गुन्हा नोंदण्याची कारवाई सुरू आहे. यावल तहसील कार्यालय मार्फत अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड आकारणी केलेली आहे. परंतु वाहन मालकांनी अद्यापपावेतो दंड रकमेचा भरणा केला नसल्याने वाहन मालकांच्या नावे असलेले सातबारे उतारे सादर केलेले आहेत. त्या अनुषंगाने मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केली आहे.
यावल तालुक्यातील साकळी येथील नितेश हरी कोळी १ लाख २७ हजार, समाधान मंगल सोनवणे एकूण रक्कम २ लाख ४८ हजार ८५९, सुपडू रमेश साळुंखे (रा. धामणी) यांच्याकडून २ लाख २५ हजार १७४ रुपये यांच्या मालमत्तेच्या माध्यमातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती यावल तहसील कार्यालयातून मिळाली आहे.