साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनातील एक अत्यंत लोकप्रिय असणारा ‘कवी कट्टा’ उपक्रम दोन दिवस आयोजित केला आहे. त्यात महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना सहभागी होता येईल.
अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात ‘कवी कट्टा’ नियोजनाबाबत बैठक नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी मराठी वाड्मय मंडळाचे कार्यवाहक नरेंद्र निकुंभ होते. व्यासपीठावर ‘कवी कट्टा’चे प्रमुख संयोजक तथा पुणे मंडळाचे उपाध्यक्ष राजन लाखे, ‘कवी कट्टा’चे समन्वयक रमेश पवार उपस्थित होते. बैठकीत ‘कवी कट्टा’ आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करुन विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. राजन लाखे यांनी हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने कसा यशस्वी करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.
बैठकीला म.वा.मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पूनम साळुंखे आदींची उपस्थिती होती.
संमेलनासाठी आलेल्या कवितांपैकी २०० कवितांची निवड करून कवींना निमंत्रित केले जाणार आहे. कवींनी नियमानुसार आपली कविता पाठवावी, असे आव्हान साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केले आहे.
‘कवी कट्टा’साठी पाठविण्यात येणारी कविता स्वरचित असावी, प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी, कविता २० ओळीपेक्षा जास्त नसावी, निवड समितीने निवडलेल्या कविता अंतिम असेल. कवीने स्वतःचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल पानाच्या वरच्या बाजूला स्पष्ट अक्षरात लिहावा. कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर ‘कवी कट्टा’ असा स्पष्ट उल्लेख असावा. कविता फक्त पोस्टाने अथवा ई-मेल पाठवावी. व्हाट्सअप वरची कविता स्वीकारली जाणार नाही. कविता ई-मेलने पाठविताना युनिकोड फॉन्टमध्येच पाठवावी. कविता कार्यालयात पोहोचण्याची अंतिम २० डिसेंबर २०२३ असेल. ईमेलने कविता पाठविण्यासाठी Kavi katta 97 amalner@gmail.com. या ईमेल आयडीवर पाठवा. पोस्टाने कविता मराठी वा. मंडळ, नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर, जि.जळगाव-४२५४०१ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.