अमृतयात्री डी. डी. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळातर्फे सोमवारी, २९ आणि ३० डिसेंबर अशा दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा साहित्य संमेलन जळगाव रस्त्यालगतच्या शिवाजी नगरातील एकलव्य माध्यमिक व ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे. संमेलनाला साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक तथा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृतयात्री डी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. पत्रकार परिषदेला साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.एस.आर. महाजन, सचिव गोरख सूर्यवंशी, खजिनदार सुखदेव महाजन यांच्यासह संचालक उपस्थित होते.
पत्रकारांना संमेलनाविषयी पुढे माहिती देताना अध्यक्ष अमृतयात्री डी.डी. पाटील म्हणाले की, पहिल्या दिवशी २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नगर पालिका चौक ते संमेलन स्थळ अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. सकाळी १० ते १२ प्रतिमापूजन, दीप प्रज्ज्वलन व मान्यवरांचे स्वागत होईल. दुपारी १२.३० ते १. ३० खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यामधून त्यांच्या जीवनकार्याचा व कवितांचा परिचय असा ओवी गाई बहिणाबाई कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी २:३० ते ४ बोली कथाकथन, दु ४ ते ६ कवी संमेलन राहील, ७.३० ते ८ वाजेला गीत संध्या. रात्री ८ ते ९ धमाल हास्य एकांकिका. दुसऱ्या दिवशी ३० डिसेंबरला सकाळी १० ते ११ कवि संमेलन, ११ ते १२.३० परिसंवाद, १२:३० ते १.३० चर्चासत्र, दुपारी २.३० ते ४ पुरस्कार वितरण, सत्कार समारोह व संमेलनाचा समारोप होईल.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीष महाजन राहतील. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक तथा समीक्षक प्रा.डॉ. फुला बागुल राहतील. उद्घाटन उमविचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.म.सु. पगारे करणार आहे. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, म.सा.प.चे अध्यक्ष डॉ. अशोक कोळी, मुख्याधिकारी नितीन बागुल, प्रा.श्रीधर नांदेडकर, डॉ. अाशुतोष पाटील, अशोक कोतवाल, कवयित्री माया घुप्पड आदी उपस्थित राहतील.
