साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील साळवा येथील भिलाटी भागात राहणाऱ्या ऊसतोड कामगारांनी दोन भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, रमेश शालीकराम मालचे (वय-४५, रा. निशाणे, ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतातील ऊस काढण्यासाठी धरणगाव तालुक्यातील साळवा गावानजीकच्या भिलाटी वस्तीतील कामागारांना ॲडव्हॉन्स पैसे दिले होते. दरम्यान, सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रमेश मालचे व त्याचा मोठा भाऊ सुधाकर मालचे हे साळवा येथील भिलाटी वस्तीत गेले.
दसरानंतर तुम्हाला कामावर जायचे आहे, असे सुधाकर मालचे यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने प्रकाश बुधा भील, शशीकांत बुधा भील, शंकर जामा भील, रोहिदास दौलत भील, बुधा सदा भील (रा. साळबाव ता. धरणगाव) यांनी दोन्ही भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रमेश मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद करीत आहे.