जळगाव एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुकुंद नगरातील लाठी शाळेच्या मागे मानेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगास चांदीच्या मुकुटासह इतर दागिने चढविलेले असतात. हे सर्व दागिने मंदिरासमोरील राहणारे अरुण लक्ष्मण शेटे यांच्या घरी ठेवलेले असतात. सण, उत्सवाच्यावेळी ते मंदिरातील शिवलिंगास लावले जातात. फिर्यादी अरुण शेटे हे पुणे येथे कुटुंबासह मुलाकडे गेले होते. घरात ठेवलेले महादेव मंदिराचे ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटासह दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
चोरीचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या अधिपत्याखाली प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांचे पथक तयार करुन अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळावरील तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्याच्या चौकाचौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपितांचे चेहरे निष्पन्न केले.
पोलीस पथकाने तपासाची चक्र फिरवुन लागलीच सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झालेले चेहरे प्रत्यक्षात उतरुन आरोपितांना ताब्यात घेतले. आरोपी शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. प्लॉट नं.१०, रोकडे कॉम्प्लेक्सजवळ कासमवाडी, जळगाव), राहुल शेखर रावळकर (वय ३२, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले. आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सुचनेप्रमाणे पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके यांच्या अधिपत्याखाली प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी केली आहे. तपास पो.हे.कॉ. गिरीश पाटील, पो.कॉ. योगेश घुगे करीत आहे.
