दोघांसह लोखंडी कोयता जप्त ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या अजिंठा चौफुली परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अजिंठा चौफुली येथे दोन व्यक्ती कोयता घेऊन फिरत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजता अजिंठा चौफुली येथे सापळा रचून कारवाई केली.
अयोध्या नगरातील दोघांचा समावेश
कारवाईत संशयित आरोपी उमेश भगवान जाधव (वय ३३) आणि गणेश भगवान लोहार (वय २७, दोघेही रा. अयोध्या नगर, जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पो.कॉ. शादाब सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. गणेश शिरसाळे करत आहेत.
