साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील मोंढाळा रस्त्यावरील असणाऱ्या ऑइल मिलमध्ये सुरक्षा रक्षकाला बांधून ठेवत चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
आशिष जगदीश बाजोरिया (वय ४८, रा. हिंद ऑइल मिल, देशमुखवाडी, पाचोरा) यांनी २३ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली होती. त्यानुसार २३ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोंढाळा रस्त्यावरील बाजोरिया ऑइल रिफायनरी ऑइल मिलमध्ये दरोडा पडला होता. सुरक्षारक्षक प्रभाकर रामदास पाटील (वय ६१, रा. सारोळा, ता. पाचोरा) यांना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून चाकूचा धाक दाखविला होता. त्यानंतर ४ लाख ५ हजार रुपयांची रोकड, ५ हजार रुपये किमतीची गोदरेज कंपनीची तिजोरी, डीव्हीआर मशीन, मोबाईल आदी ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता.
याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पाचोरा पोलीस स्टेशन तपास करीत होते. पो.हे.कॉ. राहुल शिंपी, योगेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली. संशयित आरोपी हे फिर्यादीचे घरी आले आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी कसून तपास करत संशयित आरोपी अल्ताफ मसुद खान (वय ३१, रा. नुराणी नगर, जारगाव, ता. पाचोरा) व सरफराज हसन शहा फकीर (वय २२, रा. मुल्लावाडा, पाचोरा) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
यांनी केली कामगिरी
त्यांचा साथीदार मुक्तार उर्फ धड्या मेहबूब शेख (रा. नुरानी नगर, जारगाव, ता. पाचोरा) हा फरार आहे. संशयित आरोपींकडून पिस्तूलसारखे दिसणारे लायटर, ५० हजार रुपये रोख आणि चाकू हा जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंदे, योगेश पाटील आदींनी पार पाडली आहे.