वरणगावातील खूनप्रकरणी दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

0
15

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरात एकाच समाजात असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दुचाकीच्या धडकेचा बहाणा करत चार जणावर पाच जणांच्या टोळक्यातील एकाने सपासप वार केल्याने एकाचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून पसार झालेल्या पाचपैकी दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. दोघांना भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दुचाकी धडकेचा बहाणा केला असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

सविस्तर असे की, आकीबअली कमरअली (वय १९, रा. गौसीया नगर) हा मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नगर परिषद समोरून भवानी नगरकडे (सिनेमा रोड) जात असतांना समोरून येणाऱ्या राहील सईद सय्यद उर्फ पहेलवान याने आकीबअली याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने राहील पहेलवान याने फोन करून बोलावलेले करीम हारून मन्यार व रेहान उर्फ बबलु खालीद सैय्यद असे दोघे दुचाकीवर हातात चाकु व धारदार शस्त्र घेवून आले. यावेळी तेथे आलेल्या आरीफअली समदअली सय्यद याने वरील तिघांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राहील पहेलवान याने त्याच्या मित्राजवळील चाकु घेऊन अरबाज सय्यद पहेलवान आणि मुजाहीद सय्यद उर्फ इंजिनिअर यांनी तुला मारण्यास सांगितले असुन त्याने व त्याच्या मित्रांनी आरीफअली व आकीबअली यांच्यावर चाकुने वार केले. यावेळी जख्मींना उचलण्यासाठी आलेल्या मुस्ताकअली सय्यद यांनाही जख्मी करून तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. अशा प्रकारची फिर्याद आकीब अली कमर अली याने दिल्यावरून पाचही आरोपीविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद केली आहे.

मलकापूरजवळ दोघांच्या आवळल्या मुसक्या

शहरात झालेल्या चाकु हल्ल्यात आरीफ अली समद अली याचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच शहरात खळबळ उडाली. तसेच त्याची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी वरणगावात धाव घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, जळगाव गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पो.हे.कॉ. दीपक पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, राजेंद्र मेढे, प्रितम पाटील, बबन पाटील तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्रावण जवरे, पो.हे.कॉ. अतुल बोदडे, राहुल येवले, भूषण माळी यांना तपासाबाबत सूचना दिली. त्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित रात्री बारा वाजेदरम्यान मलकापूर येथुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपी राहील सईद सय्यद (पहेलवान) आणि रेहान खालीद सय्यद यांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेतील उर्वरित तिघे संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे. पुढील तपास वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गणेश देशमुख, पो.हे.कॉ. सुखराम सावकारे, अतुल बोदडे करीत आहेत.

मयताचा पोलीस बंदोबस्तात दफनविधी

चाकु हल्ल्यात गंभीर जख्मी झालेल्या आरीफ अली समद अली याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. इतर जख्मींवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयताचा बुधवारी, ५ जून रोजी दुपारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. यावेळी वरणगावात तळ ठोकून असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here