बारा महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्‌ ‘त्या’ जागेवर एकच कर्मचारी रुजू

0
16

सोयगाव तहसिलचा कारभार खोळंबला

साईमत/सोयगाव /प्रतिनिधी :

विधानसभा निवडणुकीपूर्वी व बदली पात्र असलेल्या बारा महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, ‘त्या’ जागेवर केवळ एकच कर्मचारी रुजू झाला आहे. त्यामुळे सोयगाव तहसिलचा कारभार खोळंबला आहे. सोयगाव तहसिलचा एकही अधिकारी स्थानिक राहत नाही. तहसिलदारांसह सर्वच नायब तहसीलदार अपडाऊन करतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनचीही गंभीर स्थिती झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन वर्षे पूर्ण झालेल्या आणि बदलीस पात्र ठरलेल्या सोयगाव तहसिल कार्यालयातून तीन लिपिक, दोन अव्वल कारकून, एक मंडळ अधिकारी, सहा तलाठी अशा बारा महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे. त्यांच्या जागेवर केवळ एकच लिपिक सोयगाव तहसील कार्यालयात रुजू झाला आहे. त्यामुळे कार्यालयीन महसूल कामकाजाचा सोयगावला बोजवारा झाला आहे. त्यातच दोन नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे आणि पुरवठा अधिकारी नाना मोरे यांच्याही बदल्या झाल्या आहे.

गोरखनाथ सुरे यांच्या जागेवर कन्नडवरून पदोन्नतीवरून आलेल्या सतीश भदाणे आणि नाना मोरे यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिवाजी थोटे यांच्याकडे पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मंडळ अधिकारी मारोती धोंडकर यांची बदली झाल्यामुळे सोयगाव महसूल मंडळ हे मंडळ अधिकारी विना आहेत. सोयगाव तहसिलला एकही निवासी नायब तहसीलदार नसल्याने रात्रीच्यावेळी सोयगाव तहसील चक्क कुलूप बंद स्थितीत राहते. त्यामुळे रात्री-अपरात्री आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनाच तोंड द्यावे लागणार आहे.

चार महसूल मंडळांना दोनच मंडळाधिकारी

सोयगाव तालुक्यत चार महसूल मंडळ आहे. परंतु दोनच मंडळ अधिकारी आहेत. सोयगाव आणि जरंडी ही दोन मंडळे मंडळाधिकारी विनाच असल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here