साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या लोण-पिराचे,बोदर्डे,कोठली व निंभोरा ह्या चारही गावातु न एकाच रात्री तब्बल बारा गुरे चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. लोण येथील गावाला लागूनच असलेल्या शेड मधून व मोकळ्या जागी बांधलेली गुरे अज्ञात वाहनात टाकून भामटे पसार झाल्याचा अंदाज लोण ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रामकृष्ण मांगो पाटील यांची ऐंशी हजार रुपये किमतीची बैलजोडी व तीस हजार रुपये किमतीची गाय चोरून नेली आहे. तर रघुनाथ शायसिंग पाटील यांची एक गाय व दोन वासरे असे तीन गुरे अंदाजे एकलाख रुपये किमतीचे पशुधन तेथून चोरी झाले आहेत. तर बोदर्डे येथील सुनील प्रल्हाद पाटील यांचेही एक पशु व कोठली येथील भिकन संतोष पाटील ह्या शेतकऱ्यांचे तीन पशु तसेच निंभोरा येथील माधवराव लुडू पाटील ह्या शेतकऱ्यांचे दोन पशु असे एकूण चार गावातून तब्बल बारा पशुधन चोरी झाले आहेत. चारही गावातील शेतकऱ्यांचे मिळून तब्बल चार ते पाच लाख रुपये किमतीचे पशुधन चोरी झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या चोरीच्या घटनेचे भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार-छबुलाल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल-प्रकाश गवळी यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस निरीक्षक- अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार-छबुलाल नागरे,पोलीस कॉन्स्टेबल- नरेंद्र विसपुते,प्रकाश गवळी करीत आहेत.तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने पशुपालकांना गुरे व ढोरे रस्त्याच्या कडेला न बांधता ते सुरक्षित ठिकाणी बांधावे तसेच आपल्या पशुधनाकडे लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी पशुपालकांना केले आहे.