साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील श्रीरामपेठ येथील समाज बांधव, मित्र मंडळ, क्षेत्रीय माळी समाज, माळी गल्ली यांच्यावतीने सालाबादप्रमाणे बैल पोळा सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातून बारा गाड्या ओढल्या जातात. प्रथम श्रीरामपेठ येथील बांधव आणि मित्र मंडळातर्फे बारा गाड्या ओढण्यात आल्या. त्या मम्मा देवी मंदिरापासून ते श्रीराम मंदीर श्रीरामपेठपर्यंत मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या.
येथील क्षेत्रीय माळी समाज आणि मित्र मंडळ, माळी गल्ली आयोजित बारा गाड्या उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील पाचोरा रस्त्यावरील म्हसोबा मंदिरापासून राजमाता जिजाऊ चौक (नगर पालिका चौक) पर्यंत बारा गाड्या ओढण्यात आल्या. बारा गाड्या ह्या भरगच्च भाविकांनी भरलेल्या होत्या. यावेळी शहारातील भाविक भक्त, अबाल वृद्ध यांच्यासह तरुण मंडळी सवाद्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. पाचोरा रोड व मम्मा देवी मंदिर परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणात रोडच्या दुतर्फा गर्दी होती. बारा गाड्या उत्सव अगदी शांततेत पार पडला. उत्सवा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यातर्फे चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.