रावेरच्या शिरपेचात मानाचा तुरा: भूमिपुत्राची ‘ट्रेडफ्लॉग’ने घेतली दखल

0
23

भारतातील सर्वात उंच इमारत उभारण्याची संकेत अग्रवालला मिळाली संधी

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

वरळी (मुंबई) येथे उभ्या राहत असलेल्या सर्वात उंच इमारतीचे काम करण्याची प्रमुख जबाबदारी रावेर येथील युवकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. संकेत अग्रवाल रिअल इस्टेट क्षेत्रात मित्तल ब्रदर्स कन्स्ट्रकशन कंपनीत कार्यरत आहे. या काळात अल्पावधीत त्याने कामाचा ठसा उमटविण्यात यश मिळविले आहे. जगभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असलेल्या ‘ट्रेडफ्लॉग’कडून संकेत अग्रवाल यांची दखल घेत त्यांचा गौरव केल्याने, रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

येथील केळी उद्योजक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांचे चिरंजीव संकेत अग्रवाल सध्या पुणे-मुंबई येथे बांधकाम क्षेत्रात काम करत आहे. मित्तल ब्रदर्स या कंपनीत ते उपाध्यक्ष पदावर आहे. त्यांनी अल्पावधीत केलेल्या कामाची, बांधकाम व्यवसायिक उद्योगजगतात काम करत असलेल्या लोकांचे मुल्यांकन करत असलेल्या ‘ट्रेडफ्लॉग’ मासिकाकडून दखल घेत त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून सन्मानित केले आहे. पुण्यातील एमआयटी मधून सिव्हील इंजिनिअरींग व एमटेक उच्च शिक्षण घेतल्यावर संकेतने पाच वर्षापासून रिअल इस्टेट क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाने प्रभावित होवून मित्तल ब्रदर्स कंपनीने आपल्या समूहात आणून उपाध्यक्ष पदाची संधी दिली.

मुंबई येथे होणारी २९४ मीटर उंचीची इमारत सर्वाधिक उंच रहिवासी इमारत म्हणून गणली जाणार आहे. या प्रोजेक्टची मोठी जबाबदारी संकेतवर असणार आहे. त्यांनी अनेक अडचणींना बाजूला सारून आता इमारतीला पूर्ण करण्यासाठी सुरवात केली आहे. मित्तल ब्रदर्स पुण्यात गेल्या ५० वर्षापासून या क्षेत्रात आहे. संकेतचे काम पाहून कमी कालावधीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

बदल घडवून आणण्याची मिळविली क्षमता

माझे वडील माझ्यासाठी खुप सपोर्टर आणि प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी मला नैतिकता, प्रामाणिकपणा, सचोटी शिकवली आहे. ही माझ्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे मला चिकाटी, नम्रता आणि चिरस्थायी नातेसंबंध निर्माण करण्याचे कौशल्य मिळाले आहे. त्यामुळे नवनवीन आव्हाने त्यांना सोडवून रिअल इस्टेटमध्ये परिवर्तनीय बदल घडवून आणण्याची क्षमता मिळविली आहे.

-संकेत अग्रवाल, असो.डायरेक्टर, मित्तल ब्रदर्स, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here