साईमत, चोपडा : प्रतिनिधी
मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियनच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवारी, १ ऑक्टोबर रोजी चोपडा येथे सकाळी ११ वाजता त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनाचे आयोजन केले आहे. अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड शिवकुमार गणवीर (राज्य सचिव, लाल बावटा शेतमजूर युनियन) तर अध्यक्षस्थानी भारतीय शेत मजदुर युनियनचे राष्ट्रीय कमिटी मेंबर अमृत महाजन असतील. अधिवेशनात जळगाव अंनिसचे कार्याध्यक्ष जे. डी. ठाकरे, का. प्रा. प्रकाश चौधरी, भाकपचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, देविदास बोंदारडे, राजेंद्र झा आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने चोपडा आणि अमळनेर तालुक्यात शेतमजुर युनियनचे काम सतत चालते. त्यादृष्टीने संघटन मजबूत व्हावे, म्हणून आयोजित केलेल्या अधिवेशनात गायरान जंगल जमीन कसणाऱ्यांचे नावे करा, रोजगार हमी शहरी भागातही लागू करा, मागेल त्याला रेशन कार्ड द्या, १४ जीवनावश्यक वस्तू रेशन दुकानांमधून मिळाव्यात, शेतमजुरांच्या बचत गटांना कामे द्या, शेतमजुरांना घरासाठी ५ लाख रुपये द्या, पेन्शन ३ हजार रुपये द्या, मजुरांच्या बचत गटांना कामे व कर्ज द्या अशा विविध मागण्या, समस्यांविषयी चर्चा आणि ठराव घेतले जाणार आहेत.
अधिवेशनाला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतमजूर बांधव व भगिनी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे, वासुदेव कोळी, शांताराम पाटील, बाळू लोहार, इरफान मण्यार, अरुणा काळे, अंबालाल राजपूत, जिजाबाई राणेराजपूत, अरमान पावरा, सुमती वारके, प्रेमसिंग बरेला, बंटी पावरा, रामसिंग पावरा, संतोष कुंभार, बाळू कोळी, कौतिक कोळी, विश्वास पाटील, हिराबाई सोनवणे, प्रेमसिंग बारेला यांच्यासह शेतमजूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.