मानापुरी पाड्यात घराघरात लावले दीप, वाटले फराळ अन् आनंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकात्मतेचा उत्सव. हाच संदेश देत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या सदस्यांनी यावर्षी अत्यंत दुर्गम भागातील यावल तालुक्यातील मानापुरी पाडा येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने “दीपोत्सव” साजरा केला. उपक्रमात संस्थेच्या भगिनींनी स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करण्यापूर्वी आदिवासी पाड्यावर जाऊन घराघरात दिवे लावले. फराळ, वाती, तेल, पणत्या, कपडे आणि लहान मुलांना फटाके वाटले. यानिमित्त त्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेची लहर दिसून आली.
दिवाळीचा सण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि मानवी एकतेचा द्योतक आहे. हाच मानवतेचा दीप पेटवत नारीशक्ती आणि रेड स्वस्तिक सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी “आदिवासी बांधवांसोबत खरी दिवाळी” साजरी केली. उपक्रमासाठी रेड स्वस्तिक सोसायटीचे महाव्यवस्थापक डॉ. टी. एस. भाल, सहमहाव्यवस्थापक तथा राज्य सचिव अशोक शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे, मनीषा पाटील, डॉ. धनंजय बेंद्रे, नरेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
उपक्रमाला आर. के. टी. चेअर्सचे मुकेश भाई, नीलिमा नायर, स्वप्नील परदेसी, आर. के. शर्मा, माधुरी टोके, डॉ. गणेश पाटील, वंदना मंडावरे, नूतन तासखेडकर यांच्यासह बिरसा महामानव संघटनाचे राज्याध्यक्ष बिरम बारेला यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. उपक्रमामुळे आदिवासी पाड्यात खऱ्या अर्थाने प्रकाशाचा, आनंदाचा आणि मानवतेचा “दीपोत्सव” उजळून निघाला.