तब्बल सात गावठी पिस्तुलासह दहा जिवंत काडतुसची वाहतूक

0
1

दोघांना अटक, तीन लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त

साईमत।चोपडा।प्रतिनिधी।

तालुक्यातील उमर्टी ते हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दोन जणांकडून तब्बल सात गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि दुचाकी असा तीन लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दिली.

सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील उमर्टी ते हातेड रस्त्यावर दोन संशयित आरोपी दुचाकीवरून अवैधपणे गावठी पिस्तुलांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता हातेड रस्त्यावरील पाटचारी पुलावर सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवर दोन जण आले, त्यांची विचारपूस केल्यावर त्यांच्या जवळून सात गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतूस, दोन मोबाईल आढळून आले. यासंदर्भात त्यांनी अधिक चौकशी केल्यावर गुन्हेगारांवर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सागर शरणम रणसौरे (वय २४, रा. धायरी फाटा, पार्वती नारायण बिल्डिंग, प्लॉट नंबर ०४, पुणे, ४१, मूळ रा.बालाजी नगर पॉवर हाऊस, पुणे ४६), मनोज राजेंद्र खांडेकर (वय २५, रा. मु.पो. जुळेवाडी, ता.कन्नड, जि.सातारा) यांना गुन्ह्याच्या तपासाकामी अटक केली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांच्या सुचनेनुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस नाईक शशिकांत पाटील, रावसाहेब पाटील, चेतन महाजन, होमगार्ड प्रदीप शिरसाठ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here