जि.प.च्या आरोग्यासह ग्रामपंचायत विभागाचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंगळवारी, १३ मे पासून सुरू झालेल्या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी, १४ मे रोजी आरोग्य विभागासह ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे पार पडली. ही प्रक्रिया समुपदेशन प्रक्रियेद्वारे आणि इन कॅमेरा रेकॉर्डिंगसह राबविण्यात आली. त्यामुळे कोणतीही तक्रार किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता टाळण्यास मदत झाली आहे. बदली प्रक्रियेवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागांतर्गत ९ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. त्यामध्ये प्रशासकीय कोट्यातून १९ कर्मचाऱ्यांची बदली तर ३१ कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीचा लाभ घेतला. याव्यतिरिक्त ६ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्याही करण्यात आल्या. ग्रामपंचायत विभागातही बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. या विभागातील २ संवर्गातील २० कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या तर ४० कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या विनंतीनुसार दुसरीकडे बदली करून घेतली.
सोयीनुसार अन् प्रशासकीय गरजा
लक्षात घेऊन राबविली प्रक्रिया
आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षिका या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत विभागातील ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात आल्या. ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन सुरळीतपणे पार पाडली असल्याचे दिसून आले.
