शहरातील चौकांमधील वाहतुक कोंडी ; राष्ट्रीय महामार्ग, महापालिका, पोलीस विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

0
26

साईमत/ न्यूजनेटवर्क / जळगाव

शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्त्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग,वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक, रस्त्यातील अतिक्रमण संदर्भात जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले आहे.

प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग याच्या पत्रात ‘ आकाशवाणी चौक, अजिंठा चौक आणि इच्छादेवी चौक येथे वाहतूक सिग्नल उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. धुळ्याकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंबलरच्या पट्ट्या आणि रिफ्लेक्टरही देण्यात येतील. वरील तिन्ही ठिकाणचे खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. तसेच या तिन्ही जंक्शनवर यापूर्वी प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलांच्या प्रस्तावाची प्रत लवकरात लवकर या कार्यालयात सादर करावी अशा सूचना केल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्त यांना, ‘ जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. परिणामी सदर तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात देखील झालेले आहेत. त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. तर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना, आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली व ईच्छादेवी चौक येथील रहदारी नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याबाबत त्यांच्या स्तरावरुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.

वेळोवेळी देण्यात आले स्मरणपत्र
वाहतुक कोंडी, होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी स्मरणपत्र देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद केले असून याविषयाचे गांभिर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here