भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जिल्हा बंद आवाहनाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
बांगलादेशात हिंदू समाजासह, बौध्द, जैन समाजाच्या नागरिकांवर क्रुर अत्याचार होत आहेत. महिला, मुलींवर घृणास्पद कृत्य समाजकंटकांकडून केले जात आहेत. त्याचप्रमाणे मंदिरे व श्रध्दास्थाने जिहादींकडून लक्ष्य केली जात आहेत, तोडफोड केली जात आहे. अशा अन्याय अत्याचाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध मोर्चा तसेच अन्यायग्रस्त बांधवांना भावनिक बळ देण्यासाठी हिंदू समाजाचा जळगाव जिल्हा बंद आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. तसेच असंख्य व्यवहार ठप्प झाले होते.
भुसावळला सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मूक मोर्चा
भुसावळ : बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर तेथील बहुसंख्य समाजाकडून प्रचंड अत्याचार होत आहेत. या अत्याचाराच्या निषेधार्थ भुसावळमधील सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.मोर्चाला सकाळी १० वाजेला जामनेर रस्त्यावरील अष्टभुजा देवी मंदिर येथून निघाला. मोर्चात बक्षो गुरुदासराम जग्यासी, स्वामी ब्रह्मानंद (दत्त गिरणारी मठ), रासयात्रादास (इस्कॉन), धर्मस्वरूप स्वामीजी शास्त्री, ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर, प्रभाकर शास्त्री (चक्रधर मंदिर), गोटू गोरवाडकर गुरुजी, अमृत रामदास जग्यासी, बालयोगी महामंडलेश्वर गेंदालाल बाबा, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, अर्जुनसिंगजी महाराज(शीख समाज धर्म गुरू), माधवस्वामी शास्त्री, भक्तीश्रीजी महाराज, सुमनतीस भंतेजी, अंगुलीमाल भांतेजी, शामरन भंतेजी यांच्यासह विविध संप्रदायांचे धर्मगुरू साधुसंत, व्यापारी, सराफ असोसिएशन, हॉटेल चालक, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यवसायिक, युवक- युवती, श्री गणेश व नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. भाजी बाजार डेली मार्केट, सर्व दुकाने बंद राहिली. शैक्षणिक शाळा, महाविद्यालये आणि वकील संघाने काळया फिती लावून निषेध नोंदविला. न्यायालयातही पक्षकारांचा शुकशुकाट होता. मोर्चा अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड, ब्राह्मण संघ, मरीमाता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, गांधी चौक, अमर स्टोअर्स, बाजारपेठ पोलीस स्टेशन, लोखंडी पूल, गुजराती स्वीट, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळा, जळगाव रोड, प्रभाकर हॉल समोरील प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चाच्या अग्रस्थानी निषेध फलक, राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज, चार रांगेत मोर्चात सहभागी हजारो लोकांची उपस्थिती होती. मोर्चात कुठल्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. मोर्चा प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर निषेध मोर्चाचे लेखी निवेदन मोर्चाचे नेतृत्व करणारे सर्व साधू संत धर्मगुरू, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन मोर्चातील नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित संतांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.
बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रावेर : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निवारणार्थ शासकीय स्तरावरून उचित संदेश शासन दरबारी मिळावा, केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी रावेर तालुका सकल हिंदु समाजाच्यावतीने संदेश जावा. शांततेत व कडकडीत बंद ठेवून रावेर शहरातील समस्त व्यापारी, उद्योजक, छोटे-मोठे दुकानदार यांनी दुराचारी प्रवृत्तीला आपला विरोध दर्शवित बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवार रावेरचा बाजार बंद ठेवून तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुकशुकाट होता. एसटी वाहतूक सुरू होती. पण प्रवासी तुरळक होते. महाविद्यालय, शाळा, अन्य बाजारपेठ मार्केट संपूर्ण बंद होते. सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हा बंदची हाक यास रावेर सकल हिंदू समाजाच्यावतीने रावेर तालुक्यात कडकडीत बंद शंभर टक्के यशस्वी झाला. दरम्यान, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, तहसीलदार बंडु कापसे यांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. बंद शांततेत पार पडला.
निंभोऱ्यात बंदच्या हाकेला शंभर टक्के प्रतिसाद
निंभोरा बु.,ता.रावेर : बांगलादेशात हिंदू समाजावरील अत्याचार, हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आली होती. त्या बंदच्या हाकेला निंभोरा बु. गाव व स्टेशन परिसरातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपआपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदचे आवाहन करण्यासाठी गावातील सर्व सकल हिंदु समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्यासाठी विनंती केली. बंदच्या हाकेला नागरिकांसह व्यापारी वर्गाचा प्रतिसाद शंभर टक्के मिळाला. बंद शांततेत पार पडला. यासाठी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, उप पोलीस निरीक्षक राका पाटील तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाघ, पोलीस नाईक सुरेश पवार, पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड स्टाफ अशा सर्वांचे सहकार्य लाभले.
मुक्ताईनगरला निषेध मोर्चा
मुक्ताईनगर : बांगला देशातील अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अत्याचाराबाबत मुक्ताईनगर जळगाव जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुक्ताईनगर शहरात हिंदू समाजाच्यावतीने परिवर्तन चौक येथून निषेध मोर्चास सुरुवात होऊन बस स्थानक-बस डेपो-आनंद ट्रेडर्समार्गे निषेध मोर्चा काढण्यात आला.तहसीलदार कार्यालयात तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाला धर्म जागरण प्रांतचे सदस्य भालचंद्र दिनकर कुलकर्णी यांनी संबोधित केले. यावेळी तालुक्यासह शहरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांचे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. सकल हिंदु समाज बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीने चिंतीत आहेत. त्यामुळे भारत सरकारने निवेदनातील प्रमुख मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावलला बंदला प्रतिसाद
यावल : बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्हा बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार यावल शहरात शुक्रवारी, १६ ऑगस्ट रो जी सकाळपासून ९८ टक्के व्यवसायिकांनी आपले दुकाने आपले बंद ठेवत सकल हिंदू समाज आणि एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल यांना पाठिंबा दिला. बांगलादेशात हिंदू बांधव मरण पावले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावल शहरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. सर्व हिंदू बांधवांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त संख्येने वृक्षारोपणासाठी प्रतिसाद द्यावा. आपल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पित करावी, असे आवाहन करण्यात आले. सकाळी यावल नगरपरिषद “साठवण तलाव” पासून तर श्री खंडेराव मंदिरापासून समोरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण आणि यावल शहर बंदच्या कार्यक्रमात यावल शहरातील सकल हिंदू समाज एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सावद्यात निघाला मोर्चा
सावदा, ता.रावेर : येथील गांधी चौकातून सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध भागातून मोर्चा निघून परत गांधी चौकात आला. त्यात भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, ॲड.कालिदास ठाकूर, अभय वारके, विक्की भिडे यांच्यासह शहरातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदमुळे शहरात दिवसभर कडकडीत बंद असल्याने सदैव गजबजणारा बस स्टॅन्ड, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक आदी भागात शुकशुकाट जाणवत होता.