साईमत, पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील सबगव्हाण टोलनाका गुन्हा प्रकरणाचा कमी कालावधीत उलगडा करुन आरोपींना तात्काळ अटक करणाऱ्या पारोळा पोलीस निरीक्षकांसह पथकास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग सहावरील सबगव्हाण टोलनाका हा सुरू होण्यापूर्वीच ११ मार्चच्या मध्यरात्री चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड जाळपोळ करून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले होते. याप्रकरणी फिर्यादीनुसार पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपींनी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले होते. त्या अनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार सुनील हटकर,दीपक अहिरे,आशिष गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला होता.
१७ मार्च रोजी आझाद नगर पोलीस ठाणे (धुळे) हद्दीतील संशयित आरोपी प्रितेश उर्फ सोनू गुजर यास अटक करण्यास यश आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर चार साथीदार निष्पन्न झाले. तसेच २८ मार्च रोजी मध्यरात्री तीन आरोपी हे सोनगीर (ता.जि.धुळे) येथे येणार असल्याची गोपनीय माहितीही मिळाली होती. त्यावरून पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार, सुनील हटकर, दीपक अहिरे, आशिष गायकवाड यांनी सापळा रचून आकाश गुजर, अजय पवार, तुषार बागल या तिघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, गुन्ह्यातील पाचवा आरोपी व गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांना मिळून येत नसल्याने त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना गुन्ह्यातील वाहन हे धुळ्यातील एका व्यक्तीचे असून त्याने ते सुरत येथे लावून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सुरत येथे जाऊन वाहनही जप्त केले.
या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पारोळा पोलिसांना प्रशस्तपत्रक देऊन गौरविले. याप्रसंगी चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या उपस्थितीत पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार, अमळनेर उपविभागातील एरंडोल पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पारोळा येथील हवालदार सुनील हटकर, बापू पारधी, दीपक अहिरे, आशिष गायकवाड, मारवाड येथील उज्ज्वल पाटील या पथकाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.