चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आयोजित कार्यशाळेत आ.सुरेश भोळे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सर्वत्र वाढत जाणारे मोबाईलचे व्यसन ही सामाजिक, मानसिक समस्या सद्यस्थितीला गंभीर बनू पाहत आहे. मोबाईलमुळे लहान मुलांच्या संस्कारांवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. सोबतच मोबाईलच्या अतिवापरामुळे परिवारातील ‘संवाद’ हरपत चालला आहे. त्यासाठी परिवारातील नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष ‘संवाद’ महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शहराचे आ.सुरेश भोळे ऊर्फ राजू मामा यांनी केले. मोबाईलच्या वाढत्या अतिवापराच्या पार्श्वभूमीवर चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे रविवारी, २४ ऑगस्ट रोजी जलाराम नगर गिरणा नदीच्या किनारी जलाराम बाप्पा मंदिराच्या सभागृहात सर्वांसाठी विनामूल्य आयोजित ‘मोबाईल मुक्ती’च्या कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम उपस्थितांसमोर मांडले. तसेच विविध अनुभवांसह त्यांनी उदाहरणेही दिली.
कार्यशाळेला काऊन्सेलर डॉ. रूपाली सरोदे (वर्धा), चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तथा मानसतज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते, चेतना विसपुते, डॉ.ए.एम.चौधरी, पर्यावरण शिक्षक प्रवीण पाटील, अमित माळी, निलेश काळे, शक्ती महाजन, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापक प्रतीक सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मोबाईलच्या वाढत्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. यासोबतच मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे मानसिक, शारीरिक, सामाजिक दुष्परिणामावर डॉ. रूपाली सरोदे, डॉ. नितीन विसपुते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचा संतुलित वापर कसा करावा, याविषयी उपयुक्त टिप्स देत त्यांनी सहभागींचे डोळे उघडले.
मोबाईल व्यसनमुक्तीसाठी जनजागृती सुरू ठेवण्याचा संकल्प
कार्यशाळेत अमित माळी यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवरील स्वतःचे अनुभव कथन करून उपस्थितांवर भावनिक छाप सोडली. त्यानंतर त्यांच्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या गीताने कार्यशाळेतील वातावरण भारावून गेले होते. कार्यशाळेला नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी मोबाईलच्या व्यसनमुक्तीसाठी समाजात जनजागृती सुरू ठेवण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शुभदा नेवे तर प्रवीण पाटील यांनी आभार मानले.