साईमत : जळगाव : प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला गव्हर्नर आशा वेणूगोपाल (नाशिक) यांनी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलला अधिकृत क्लब भेट दिली.
गणपती नगरातील डॉ.जी. डी. बेंडाळे वेल्फेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात रोटरी सेंट्रलच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसमवेत त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल रवींद्र शिरुडे, अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आशा वेणूगोपाल यांनी सेवा प्रकल्प राबवताना गरज तिथेच कार्य करावे असे सांगून आगामी काळात धूर मुक्त चुली, नवजात बाळांच्या पायाची समस्या आणि वाहतूक पोलिसांसाठी तणावमुक्ती या विषयांवर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश चौधरी संपादित क्लब बुलेटीनच्या दुसऱ्या अंकाचे वेणुगोपाल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रोटरी फाउंडेशनच्या सेवाकार्यासाठी माजी अध्यक्ष संतोष अग्रवाल यांच्या हस्ते क्लबचा धनादेश गव्हर्नर यांच्याकडे प्रदान करण्यात आला. सहप्रांतपाल रवींद्र शिरुडे (चाळीसगाव) यांनी शहरातील दहा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेट्या क्लबकडे सुपूर्द केल्या.
अध्यक्ष कल्पेश शाह यांनी मनोगत व्यक्त केले मानद सचिव दिनेश थोरात यांनी कार्य अहवाल पीपीटी द्वारे सादर केला. सूत्रसंचालन कृती शाह यांनी तर परिचय सहप्रांतपाल शिरुडे यांनी करून दिला. प्रेसिडेंट इलेक्ट दिनेश थोरात यांनी आभार मानले.
पहिल्या सत्रात गव्हर्नर आशा वेणुगोपाल यांनी अध्यक्ष, मानद सचिव, कोषाध्यक्ष, सहप्रांतपाल व प्रेसिडेंट इलेक्ट यांना बैठकीत संबोधित केले. नंतर त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्या समवेत संवाद साधला. सर्व कमिटी चेअरमन यांनी वेणुगोपाल यांना केलेल्या कार्याची व आगामी उपक्रमाची माहिती सादर केली.