साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील दाताळा ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक सुधीर ढोले ग्रामसेवकाची बदली होऊन पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु तेथील ग्रामसेवक हे पदभार सोडण्यास तयार नाही. तसेच देवधाबा येथील ग्रामसेवक दीपक ठाकूर या ग्रामसेवकांच्या मनमानीला ग्रामस्थ त्रस्त झाली आहे. घरकुल आणि शौचालय बांधण्याचे पैसे द्याल तर काम होतील, अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची बदली होत नाही, तोपर्यंत पंचायत समितीला टाळे लावून आंदोलनाचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांनी सोमवारी, ८ जानेवारीला पंचायत समिती कार्यालय तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकले.
तालुक्यातील दाताळा आणि देवधाबा अशा दोन्ही गावांमध्ये शासनाच्या योजनांचा जसे घरकुल, शौचालय यासह आदी योजनांचा लाभ देतांना हेतुपुरस्सर पात्र लाभार्थ्यांना डावलण्याचा प्रकार होत आहे. घरकुलाचे धनादेश तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण हे दोन्ही ग्रामसेवक करीत असल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे दाताळा येथील ग्रामसेवक सुधीर ढोले यांची बदली होऊनही ते आपला पदभार सोडत नाहीत. त्यांना देऊन सांगतात की, माझे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये बरेच पैसे अडकलेले आहेत. ते पैसे निघाल्याशिवाय मी कोणालाही चार्ज देणार नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी संघटनेच्या नावावर व आपल्याकडे असलेल्या संघटनेचा पदाचा दुरूपयोग करणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे दाताळा ग्रामपंचायतबाबत ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आदेश दिल्या नंतरही पं. स. च्यावतीने ग्रामसेवकाला चार्ज दिला गेला नाही. खाते बदलही केला नसल्याने ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तेव्हा अशा दोन्ही ग्रामसेवकांना जोपर्यंत तालुक्याच्या बाहेर बदली देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती कार्यालयातून जाणार नाही, असा इशारा शिवचंद्र तायडे यांनी दिला. आठ दिवसांमध्ये बदली करतो, असे आश्वासन बुलढाणा येथील बीडीओ यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
दाताळा येथील सरपंच विद्या हरीभाऊ देशमुख यांनी सांगितले की, ग्रामसेवक ढोले हे आमच्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाची नियुक्ती झाली असतांनाही त्यांना चार्ज देत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीची अनेक कामे खोळंबली आहे. तेव्हा त्यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृउबासचे संचालक संजय काजळे पाटील, हरीभाऊ देशमुख, देवधाबाचे सरपंच देवसिंग सोळंके, ग्रा.पं. सदस्य सुवर्णा ढगे, विनोद गोरोडे, विनायक सपकाळ, गोपाल गुरचळ, कुंदन मंडवाले, मोरखेडचे सरपंच पराग नाफडे, उपसरपंच गिताबाई जंगले, ग्रा. पं. सदस्य दुर्गाबाई तांगडे, योगेश चोपडे, संजय बंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.