बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर कपाशी उपटुन फेकण्याची वेळ

0
20

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

परिसरात संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने बरड भागातील विहिरींनी तळ गाठल्याने पिके हातची गेली. काही भागातील बागायत विहिरींना असलेल्या जेमतेम पाण्याच्या भरवश्‍यावर कपाशी फरदड ठेवली. मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हिरव्यागार असलेल्या कपाशी उपटुन फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ असल्याचे चित्र कजगावसह परिसरात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कजगावसह परिसरात संपूर्ण पावसाळ्यात एखाद दोन पाऊस झाले. पूर्ण पावसाळा कोरडा समान गेल्याने या भागातील नदी, नाले, लहान बंधारे, लहान धरणही चक्क पावसाळ्यात कोरडीठाक पडली होती.त्यामुळे शेतशिवारातील विहिरीच्या जल पातळ्या चक्क पावसाळ्यात तर वाढल्याच नाही उलट त्यांनी पावसाळ्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली होती. आता तर बरड भागातील काही विहिरी चक्क कोरड्या पडू लागल्या आहेत तर काही विहिरी तीन दिवसांच्या साठोब्यानंतर एक तासचा भरणा भरत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.

खरीपचे उत्पन्न ७० टक्के घटले आहे. विहिरी आटल्याने रब्बी उत्पन्नाची आशा धुसर झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आता पिकविमा अनुदान व दुष्काळ निधी लवकर मिळावा, अशी मागणी हवालदिल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अत्यल्प झालेल्या पावसामुळे कजगाव मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला असल्याने दुष्काळ निधी व विमा अनुदान मिळणाऱ्या निधीकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत. शासनाने तात्काळ दोन्ही निधी वितरण करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here