ग्रामपंचायतीला सफाई कामगार नसल्याने ग्रामस्थांचे हाल
साईमत/भुसावळ /प्रतिनिधी :
येथे बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयात सांगूनही राहत्या घराजवळील गटारीचे काम होत नसल्याने तसेच गेल्या दोन वर्षापासून एकही सफाई कामगार गटारीची साफसफाई करण्यासाठी आलेला नसल्यामुळे, माझे कुटुंबातील सदस्य आजारी पडण्याची शक्यता असल्याचे कारण देत सुनसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सतिश सुरेश पाटील यांनी आठ दिवसाच्या आत गटारीचे काम सुरु न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
माजी सरपंच सतिश पाटील यांच्या राहत्या घरापासून सतिश सिताराम पाटील यांच्या गोठ्याला लागून विकासोच्या मागील बाजूस ही गटार आहे. याबाबत सरपंचांना विचारले असता लवकरात लवकर गटार साफसफाई व बांधकाम करण्यात येईल, असे सांगितले आहे. गावात ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. तसेच एक सफाई कामगार काम करत होता. मात्र, स्वातंत्र्यदिनी काही ग्रामस्थांनी तक्रार केल्यामुळे त्या सफाई कामगाराला कामा वरुन काढल्याचे समजते.
आता ग्रामपंचायतीला सफाई कामगार नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून ग्रामपंचायत पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून माजी सरपंचाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.