Tiger : धानोरा परिसरात वाघाचा वावर?

0
15

शेतात आढळले ठसे : वनविभागाकडून परिसराची पाहणी

साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी :  

धानोरा परिसरात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींनी शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी शेतात वाघाच्या पायांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले असून वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी शुक्रवारी सायंकाळी वाघीणीचे दर्शन झाल्याचे सांगितल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी देवगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतरही धानोरा, पारगाव, देवगाव व मितावली शिवारात बिबट्या आणि वाघ यांच्या हालचाली सातत्याने दिसून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण होत आहेत. शुक्रवारी देवगाव रोडवर गणपत काठियावाडी यांच्या वाड्यासमोर वाघीण रस्त्यावरून गेल्याचे काहींनी पाहिल्याचे सांगितले. या घटनेची चर्चा पसरल्यानंतर शनिवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान शेतामध्ये आढळलेल्या वाघाच्या पगमार्क्सची नोंद घेण्यात आली आहे. ठशांच्या आधारे वाघीणीचा वावर देवगाव, पारगाव आणि धानोरा या पट्ट्यात असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

वनविभागाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी, महिला व विशेषतः संध्याकाळी अथवा पहाटे शेतात जाणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वनविभागाने परिसरात गस्त वाढवण्यासह कॅमेऱ्याद्वारे हालचालींचे निरीक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. परिसरात निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणामुळे वनविभागाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, वाघीणीचा वावर नेमका कुठपर्यंत पसरला आहे याचा सखोल तपास वनविभागाकडून सुरू असून पुढील काही दिवस हा परिसर विशेष देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here