सार्वजनिक विद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील असोदा गावाचे भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचे सार सांगणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना असोद्यातील सार्वजनिक विद्यालय येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले. गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी बहिणाबाई चौधरी, सरस्वतीला माल्यार्पण करून पूजन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक लालसिंग पाटील, मंगला नारखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रीती पाटील, नूतन वाणी यांनी बहिणाबाईविषयी माहिती दिली. तसेच हेतल कोल्हे, तिच्या मैत्रिणी, सिद्धार्थ कापडणे यांनी बहिणाबाईची गाणी म्हटली. विशाखा भोळे, तिच्या मैत्रिणी यांनी “अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर” या बहिणाबाईंच्या गाण्यावर नृत्य सादर करतांना नृत्याद्वारे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून बहिणाबाईंच्या जीवनाचा सार सांगितला. बहिणाबाई निरक्षर होत्या तरी त्यांनी जीवनाला एक दिशा दाखवली, असे डॉ. मिलिंद बागुल यांनी मनोगतातून सांगितले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले.