भावगीत, भक्तीगीत, कविता अन् गझलांच्या सुमधुर सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दिवाळी पाडव्याच्या पहाटे जळगावकर रसिकांसाठी ‘सुर मांगल्या’तर्फे सादर केलेली ‘दिवाळी पाडवा पहाट’ संगीत मैफल भावगीत, भक्तीगीत, कविता आणि गझलांच्या सुरांनी रंगून गेली. महाबळ रस्त्यावरील अभियंता भवन येथे ही संगीतमय मैफल सकाळच्या गुलाबी थंडीत पार पडली. उपस्थित श्रोत्यांनी भरभरून टाळ्या वाजवत कलाकारांना दाद दिली आणि संगीताच्या स्वरपर्वात रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाली.
सुरुवातीला जयश्री चिंचोले यांनी ‘तुझं मागतो मी आता, मजा द्यावे एकदंता’ या भक्तीगीताने स्वरांची मंगल सुरुवात केली. गणपती बाप्पांकडे मागणी मागत भक्तिमय वातावरण तयार झाले. त्यानंतर विविध गायक कलाकारांनी एकापेक्षा एक सुरेल सादरीकरणे सादर करून दिवाळी पाडवा पहाट संस्मरणीय केली. जयश्री चिंचोले यांनी ‘ओंकार स्वरूपा’, ‘तुझे नाम आले ओठी’ ही भक्तीगीते सादर केली तर बी. आर. पाटील यांचे गायनही श्रोत्यांच्या मनात घर करून गेले. अविनाश चंद्रात्रे यांनी ‘उठ पंढरीच्या राजा’ आणि ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ ही गीते सादर करत भक्तिभावाचा ओलावा निर्माण केला. दीपक पाटील यांनी ‘भक्ती वाचुनी मुक्तीची, मन लागोरे लागो माझे गुरु भजनी’ हे गीत सादर करत सभागृहात अध्यात्मिक वातावरण निर्मिती केली.
सुनील रत्न पारखे यांनी ‘अबीर गुलाल’, ‘माझे माहेर पंढरी’ या गीतांनी रसिकांना भारावून टाकले तर अशोक पारधे यांनी ‘पणती जपून ठेवा अंधार फार झाला’ हे गीत सादर केले. गौरव मेहता यांनी ‘कुठे शोधशी रामेश्वर’ आणि ‘राधा ही बावरी’ या गीतांनी भावविश्व उंचावले. प्रिया सहा यांनी ‘यशोमती मैया से बोले नंदलाला’ हे गीत सादर करून भक्तिरस ओतप्रोत केला. रमेश धुरंदर यांनी श्रृंगाररसाने नटलेली गझल ‘श्रृंगारवासातील गझल’ सादर केली तर आशा साळुंखे यांनी ‘मराठी गझल’ सादर करत मैफिलीला गझलरंग दिला. पांडुरंग सोनवणे यांनी सुमधुर आवाजात ‘कसली जीवाला भूल पडे’ हे गीत सादर करत भैरवीचे सोज्वळ स्वर मैफिलीत गुंजवले. सर्व कलाकारांनी भक्तीगीत, भावगीत, कविता, चारोळ्या आणि गझलांच्या माध्यमातून सूरांच्या पर्वणीने वातावरण भारावून टाकले.
संपूर्ण सभागृहात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. टाळ्यांचा गजर आणि श्रोत्यांच्या आनंदी हसऱ्या चेहऱ्यांनी कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शेवटी ‘तुझा विसर न व्हावा’ हे भक्तीगीत समूहाने सादर केले आणि त्यानंतर पसायदानाने या संगीतमय मैफिलीची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रायोजक डी. बी. महाजन, इंजि. साहेबराव पाटील तसेच के. के. बिल्डर्सचे संचालक भूपेश कुलकर्णी होते. कार्यक्रमाला नितीन सपके, भागवत पाटील, किशोर पाटील, गोविंद पाटील, प्रदीप जोशी, भास्कर बोदडे, योगशिक्षक सुनील गुरव, प्रा. कैलास वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रसिकांना मिळाला एक अविस्मरणीय अनुभव
संगीताला साथ तबल्यावर गजानन कुलकर्णी यांनी दिली तर हार्मोनियमवर पांडुरंग सोनवणे यांनी आपल्या सुरेल साथीने सादरीकरण अधिक खुलवले. ‘सुर मांगल्या’ तर्फे सादर केलेल्या दिवाळी पाडवा पहाटेच्या संगीतमय मैफिलीने जळगावच्या सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य निर्माण केले. सकाळच्या मंद थंडीत स्वर, ताल, भाव आणि भक्ती यांच्या संगमाने रसिकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. सूत्रसंचालन डॉ. अशोक पारधे यांनी केले. त्यांनी कविता आणि चारोळ्यांच्या ओघात संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली.



